काँग्रेस १००+ जागा लढवणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशा राजकीय हालचालींना गती मिळत आहे. एका बाजूला जागावाटपावर चर्चा सुरू असताना, दुसऱ्या बाजूला इच्छुक आणि नाराज उमेदवारांना मनविण्याचे प्रयत्न पक्षाकडून सुरू आहेत. या निवडणुकीत बंडखोरी, अपक्ष उमेदवार यांसारख्या गोष्टींमुळे या निवडणुका दोन किंवा तीन पक्षांपुरत्या मर्यादित न राहता बहुरंगी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, मविआनं बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकी ८५ जागांचा निर्णय झाल्याचं स्पष्ट केलं. मात्र, गुरुवारी सकाळी विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस जास्त जागा लढवेल असं जाहीर केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
विजय वडेट्टीवारांचं विधान काय आहे?
मविआच्या पत्रकार परिषदेत, २८८ जागांपैकी तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवतील, असं जाहीर झालं होतं. या निर्णयानंतर उरलेल्या ३३ जागांपैकी १८ जागा मित्रपक्षांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. मात्र, उरलेल्या १५ जागांबाबत कोणतंही स्पष्ट विधान करण्यात आलं नव्हतं. गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी या १५ जागांची अदलाबदली तिन्ही पक्षांमध्ये होईल असं सांगितलं, आणि या १५ जागांपैकी जास्तीतजास्त जागा काँग्रेसकडे जातील असं त्यांनी जाहीर केल्यानं चर्चेला रंग चढला आहे.
“काँग्रेसची पहिली यादी लवकरच येणार आहे, ज्यात ५४ उमेदवारांची नावं असतील. केंद्रीय निवड समितीनं यास मंजुरी दिली आहे. उरलेल्या जागांसाठी पुढील चर्चा होईल, आणि जवळपास ८५ टक्के जागांची घोषणा काँग्रेसकडून संध्याकाळी होईल,” असं वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार?
मुख्यमंत्रीपदाबद्दल विचारता त्यांनी सांगितलं, “निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडी एकत्र बसून मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेईल. सध्या आम्ही या विषयावर चर्चा करत नाही. आमचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे महाविकास आघाडीचं बहुमत आणणं.”