सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणाऱ्या करविषयक बाबींमध्ये आयकर अधिकाऱ्यांनी आदेश तसेच नोटीस देताना भाषेकडे लक्ष देण अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी आज नागपूर मध्ये केले. आयकर अधिकारी पदावरून नव्याने पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक आयुक्तांच्या ‘उत्तरायण -2024’ या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आज त्यांच्या उपस्थितीत नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅडमी -एनएडीटी येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एनएडीटीचे प्रशिक्षण महासंचालक पी. सेल्वा गणेश , अतिरिक्त महासंचालक मुनीष कुमार ,उत्तरायण 2024 चे प्रशिक्षण संचालक एस.एम.व्ही.व्ही. शर्मा तसेच या अभ्यासक्रमाचे प्रभारी अतिरिक्त महासंचालक आकाश देवांगन प्रामुख्याने उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये एकनिष्ठता अभ्यासपूर्ण दृष्टिकोन कायम ठेवावा असे सिरपूरकर सांगितले .आयकर आदेशातील सर्व तथ्यांचा अभ्यास करून त्या पुन्हा पुन्हा तपासल्या पाहिजे असेही आवाहन त्यांनी आयकर अधिकाऱ्यांना केलं .
याप्रसंगी उत्तरायण 2024 या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण संचालक एस . एम. व्ही .व्ही शर्मा यांनी तुकडीचा अहवाल मांडतांना सांगितले की, गत सप्टेंबर महिन्याच्या 9 तारखेपासून सुरु झालेल्या या 7 आठवड्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात 150 नव्याने पदोन्नत झालेल्या सहाय्यक आयकर आयुक्त अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. यात 20 महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश असून सर्वात जास्त अधिकारी हे बिहार राज्यातील आहेत .या तुकडीचे सरासरी सेवा वय हे 28 वर्ष असून या तुकडीतील सर्वात तरुण अधिकारी हे 45 वर्षाचे तर सर्वात ज्येष्ठ अधिकारी हे 59 वर्षाचे आहेत .
याप्रसंगी काही प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणासंदर्भात आपले अनुभव कथन केले . प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर सीमा भारती आणि ऐला श्रीनिवास यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रधान महासंचालकांचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले .उत्तरायण 2024 च्या अधिकाऱ्यांनी एनएडीटीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा भेट स्वरूपात दिल्या आहेत. या प्रतिमांचं अनावरण सुद्धा शिरपूरकर यांच्या हस्ते झालं. अतिरिक्त महासंचालक मनीष कुमार यांनी कर्तव्यनिष्ठतेची शपथ अधिकाऱ्यांना दिली . या कार्यक्रमाला आयकर विभागाचे अधिकारी उपस्थित होते .