“मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रचार व्हॅन हे अत्यंत उत्तम माध्यम असून आम्ही 75% हून अधिक मतदान व्हावे या दृष्टीने प्रयत्नशील आहोत,” : जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर
“सीबीसीची प्रचार व्हॅन मतदानाचे प्रमाण कमी असलेल्या केंद्रांवर अधिक लक्ष केंद्रित करेल आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल”: नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी
नागपूर, 11 नोव्हेंबर 2024
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील केंद्रीय संचार ब्युरोने (सीबीसी) आज, 11 नोव्हेबर 2024 रोजी, नागपूर येथील सिव्हील लाईन्स मधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ब्युरोच्या मतदार जागरुकता प्रचार व्हॅनच्या कार्याला सुरुवात केली. हा उपक्रम, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या तयारीसाठी, स्वीप अंतर्गत मुख्य निवडणूक कार्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मतदार जागरुकता कार्यक्रमाचा भाग आहे.केंद्रीय संचार ब्युरो, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक कार्यालय आणि नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त सहयोगाने हे अभियान सुरु करण्यात आले आहे.
नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी आज इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या फिरत्या प्रदर्शनविषयक वाहनाला हिरवा झेंडा दाखवून या अभियानाचे उद्घाटन केले. मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशासह ही व्हॅन नागपूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघांना भेट देणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर म्हणाले, “मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रचार व्हॅन हे अत्यंत उत्तम माध्यम आहे. गेल्या काही निवडणुकांच्या वेळी ज्या ठिकाणी मतदानाचे प्रमाण कमी होते अशा विशिष्ट मतदान केंद्रांना भेट देण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही या व्हॅनचा मार्ग निश्चित केला आहे., राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी सक्रियतेने सहभागी होण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करणे हा या दृक-श्राव्य प्रचार सामग्रीने सुसज्ज असलेल्या व्हॅनच्या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. येत्या निवडणुकीत 75% हून अधिक मतदानाचे लक्ष्य साध्य करणे आणि नागपूर जिल्ह्याला या मतदान टक्केवारीच्या बाबतीत उत्तम कामगिरी करण्यात यश मिळवून देणे हा आमच्या या उपक्रमाचा उद्देश आहे.”
या उपक्रमाच्या महत्त्वावर अधिक भर देत नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी म्हणाले, “मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरुकता निर्माण करण्याशी संबंधित व्यापक दृक-श्राव्य सामग्रीने सुसज्ज असलेली ही व्हॅन म्हणजे नागरिकांमध्ये मतदानाची संस्कृती जोपासण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. मतदानाचे प्रमाण कमी असलेल्या केंद्रांवर अधिक लक्ष केंद्रित करत ही प्रचार व्हॅन मतदारांवर कायमस्वरूपी प्रभाव टाकण्याचे कार्य करेल आणि मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीयरित्या वाढ घडवून आणेल अशी आशा आहे.”
या अभियानाची पोहोच आणि प्रभाव वाढवत केंद्रीय संचार ब्युरोच्या नोंदणीकृत गीत आणि नाटक क्षेत्राशी संबंधित कलाकारांनी या उद्घाटन कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
मुख्य निवडणूक कार्यालय आणि विविध जिल्हा प्रशासनांच्या पाठबळासह येत्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांचा विक्रमी प्रमाणातील सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेले हे अभियान 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरु राहील.