केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; दक्षिण, पूर्व व उत्तर नागपुरात जाहीर सभा
नागपूर – गेल्या दशकात नागपूर शहराचे चित्र वेगाने बदलले. रस्ते चांगले झाले. ७५ टक्के जनतेला १२ ते २४ तास पिण्याचे पाणी मिळत आहे. आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. शहराचा चौफेर विकास झाला आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने आपण वाटचाल केली आहे. जनतेने जाती-पातीचा विचार न करता आम्हाला निवडून दिले आणि सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे शहराच्या विकासाचे संपूर्ण श्रेय नागपूरकरांना जाते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) व्यक्त केले. जेवढे काम आजपर्यंत झाले आहे, त्याच्या तिप्पट काम पुढील पाच वर्षांत होणार आहे, असा विश्वासही ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.*
दक्षिण नागपूरचे भाजप-महायुतीचे उमेदवार मोहन मते, पूर्व नागपूरचे उमेदवार कृष्णा खोपडे आणि उत्तर नागपूरचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांच्या प्रचारार्थ ना. श्री. नितीन गडकरी यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी आमदार अनिल सोले, नरेंद्र बोरकर यांची उपस्थिती होती.
ते म्हणाले, ‘गेल्या दहा वर्षांमध्ये नागपूर मोठ्या प्रमाणात बदलले आहे. एकेकाळी शहरातील रस्ते फार अरुंद होते. आज शहरातील रस्ते चांगले झाले आहेत. पूर्वी पिण्याच्या पाण्याची समस्या होती. आपण ९३ जलकुंभ बांधायला घेतले. ८३ जलकुंभ पूर्ण झाले आहेत. शहरातील ७५ टक्के जनतेला १२ ते २४ तास पाणी मिळत आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये शहरातील पाण्याचे टँकर पूर्णपणे बंद होतील.’ म्हाळगी नगर चौकापासून शताब्दी चौकाच्या पलीकडे जाणारा एक उड्डाणपूल तयार होणार आहे, अशी माहितीही ना. श्री. गडकरी यांनी दिली.
ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील
आम्ही कधीही जातीयवादाचे राजकारण केले नाही. पण आमच्याबद्दल खोटा प्रचार झाला. आम्ही संविधान बदलणार आहोत, असे काँग्रेसने लोकांना सांगितले. आम्ही संविधान बदलणार नाही आणि कुणाला बदलू देणार नाही. ताजबाग, दीक्षाभूमीचा विकास आमच्या सरकारने केला. मुस्लिम असो किंवा दलित असो, योजनांचा फायदा सर्वांना दिला. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न होईल. पण मतदारांनी काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले.
नागपुरात सीएनजी तयार होतोय
‘२४०० कोटी रुपयांची नागनदीची योजना मंजूर झाली आहे. दक्षिण नागपुरातील जेवढे नाले नागनदीला मिळतात, ते सर्व स्वच्छ होणार आहेत. ड्रेनेज सिस्टीम सुधारणार आहे. पूर्वी आपण भांडेवाडीला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकायचो, त्याची दुर्गंधी नागरिकांना त्रस्त करायची. आता त्याच ठिकाणी कचऱ्यापासून सीएनजी तयार करतोय. महापालिकेने तयार केलेल्या सीएनजीवर शहरातील स्कुटर, कार धावतील. आपली गाडी सीएनजीवर चालवली तर महिन्याला दहा हजार रुपयांच्या पेट्रोलच्या तुलनेत साडेचार हजार रुपयांचे सीएनजी लागणार आहे. शहरात पाच हजार कोटी रुपये खर्च करून पाईपने गॅस पुरवठा करण्याची योजना येत आहे. त्यामुळे आपला तीस ते चाळीस टक्के खर्च वाचणार आहे,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.
उच्च शिक्षणाची सोय झाली
भांडेवाडीच्या रिकाम्या जागेवर जागतिक मान्यतेचे सिम्बायोसिस विद्यापीठ आले. साडेचारशे कोटींची गुंतवणूक करून हा प्रकल्प उभारण्यात आला. आता उच्च शिक्षणाची सोय नागपुरातच झाली. त्याच्या बाजुलाच ५० एकर जागेवर नरसी मोनजी ही प्रतिष्ठित शिक्षण संस्था येत आहे, याचा ना. श्री. गडकरींनी आवर्जून उल्लेख केला.
आरोग्य आणि रोजगार
एक हजार बेड्सचे एम्स तयार झाले आहे. ट्रिपल आयआयटी आले. जागतिक दर्जाचे आयआयएम आले. मिहान प्रकल्पात एचसीएल, इन्फोसीस, टेक-महिंद्रा कंपन्या आल्या. आतापर्यंत ८८ हजार तरुणांना रोजगार मिळाला. पुढच्या काळात दोन लाखांपर्यंत रोजगार निर्माण होईल. ८ ते १० हजार गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेत घरे बांधून दिली आहेत. पुढच्या काळात सहा मार्केट्स, फुड मॉल उभारले जाणार आहेत. यामुळे नागरिकांची सोय तर होणारच आहे, शिवाय स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांनाही व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे.
उत्तर नागपुरात भेदभाव नाही
उत्तर नागपुरात भेदभाव केला नाही. जातीधर्माचे राजकारण केले नाही. मत नाही मिळाले तरीही रस्ते केले, पिण्याच्या पाण्याची सोय केली. कधीही जात डोक्यात ठेवली नाही, याचा ना. श्री. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला.