आम्ही जात बघून योजनांचा लाभ दिला नाही! केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी; दक्षिण व मध्य नागपुरात जाहीरसभा
नागपूर – काँग्रेसला कुठल्याही विचारांशी घेणेदेणे नाही. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचे पाप केले. पण, आमच्या सरकारने कायम ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास आणि सबका विकास’ हेच उद्दिष्ट बाळगले. समाजात सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने उज्ज्वला योजनेमध्ये साडेनऊ कोटी महिलांना गॅस सिलींडर दिले. महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेत सामावून घेतले. जात किंवा धर्म बघून आमच्या सरकारने योजनांचा लाभ दिला नाही. याउलट काँग्रेसने मात्र देशात जातीवादाचे विष कालवण्याचे काम केले, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज येथे टीका केली.
म्हाळगीनगर चौक येथे दक्षिण नागपूरचे भाजप-महायुतीचे उमेदवार मोहन मते आणि बांगलादेश येथे मध्य नागपूरचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या प्रचारार्थ ना. श्री. नितीन गडकरी यांच्या जाहीरसभा झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विकास कुंभारे, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, गिरीश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘नागपूरचा फार वेगाने विकास झाला आहे. देशातील सुंदर आणि स्वच्छ शहर म्हणून नागपूरची ओळख निर्माण होत आहे. काँग्रेसने जे साठ वर्षांत केले नाही, ते दहा वर्षांत आपण नागपुरात करून दाखवले. काँग्रेसने फक्त गरिबी हटावचा नारा दिला. पण स्वतःचीच गरिबी दूर केली. शाळा-कॉलेज उघडले, स्वतःच्याच मुलांना तिकीट दिले. आम्ही डीएड, बीएड कॉलेज सुरू केले नाही आणि स्वतःच्या मुलांना तिकीटही दिले नाही. आमच्या पक्षाने कधीही परिवारवादाचे राजकारण केले नाही.’
‘गेल्या दहा वर्षांमध्ये नागपूर मोठ्या प्रमाणात बदलले आहे. एकेकाळी शहरातील रस्ते फार अरुंद होते. आज शहरातील रस्ते चांगले झाले आहेत. पूर्वी पिण्याच्या पाण्याची समस्या होती. आपण ९३ जलकुंभ बांधायला घेतले आहेत. ८३ जलकुंभ पूर्ण झाले आहेत. शहरातील ७५ टक्के जनतेला १२ ते २४ तास पाणी मिळत आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये शहरातील पाण्याचे टँकर पूर्णपणे बंद होतील. एक हजार बेड्सचे एम्स तयार झाले आहे. ट्रिपल आयआयटी आले. जागतिक दर्जाचे आयआयएम आले. मिहान प्रकल्पात एचसीएल, इन्फोसीस, टेक-महिंद्रा कंपन्या आल्या आहेत. आतापर्यंत ८८ हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे. पुढच्या काळात दोन लाखांपर्यंत रोजगार निर्माण होईल. ८ ते १० हजार गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेत घरे बांधून दिली आहेत. पुढच्या काळात सहा मार्केट्स, फुड मॉल उभारले जाणार आहेत. यामुळे नागरिकांची सोय तर होणारच आहे, शिवाय स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांनाही व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे,’ असेही श्री. गडकरी म्हणाले.
कायम हलबा समाजाच्या पाठिशी
हलबा समाजाचे जटील प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला. हलबा समाजाशी माझे फार जुने नाते आहे. त्यामुळे जीवंत आहे तोपर्यंत हलबा समाजाच्या पाठिशी उभा राहीन. माझ्या विरोधात गेलेल्यांचेही काम करेन, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी दिला.
बांगलादेशचा प्रश्न सुटला
बांगलादेशमध्ये घरांच्या मालकीहक्काचा अडचणीचा विषय होता. आम्हाला सर्वांना मालकी हक्काचे पट्टे द्यायचे होते. त्यासाठी कायद्यांमध्ये दुरुस्ती केली. एक हजार रुपयांत रजिस्ट्री करण्याकरिता जीआर काढण्याची विनंती राज्य सरकारला केली. आता जवळपास हजार लोकांच्या घराच्या रजिस्ट्री झाल्या, असेही ना. श्री. गडकरी यांनी सांगितले. केळीबाग रोड चांगला केला तसा मेयो हॉस्पिटलपासून चारपदरी मार्ग देखील पूर्ण होणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे, असेही ना. श्री. गडकरी यांनी सांगितले.
उमरेड होतेय नागपूरची ‘सॅटेलाईट सिटी’!
उमरेड विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या प्रचारार्थ उमरेड येथे ना. श्री. गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. ते म्हणाले, ‘उमरेड व परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले आहेत. परिसरात मागील १० वर्षांत उत्तम रस्ते झाले. पायाभूत सोयीसुविधा, सिंचन, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रांतील विकासकामांमुळे उमरेड हे आता नागपूरचे सॅटेलाईट शहर म्हणून उदयास येत आहे.’
कामठीचा प्रवास सर्वांगीण विकासाच्या दिशेने
कामठी विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारार्थ मौदा येथे ना. श्री. नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. ते म्हणाले, ‘चंद्रशेखर बावनकुळे आणि टेकचंद सावरकर यांनी या मतदारसंघाचा विकास केला. या क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवले. काँक्रिटचे रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. भविष्यात कामठी मतदारसंघ टँकरमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. तरुण मुलांना रोजगार मिळावा म्हणून अनेक उद्योग मतदारसंघात सुरू झाले. मिहानमध्ये या भागातील अनेक तरुण विविध कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. कामठी मतदारसंघाचा प्रवास सर्वांगीण विकासाच्या दिशेने सुरू झाला आहे, असा विश्वास ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.