केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी; मध्य नागपुरात अखेरची जाहीर सभा
नागपूर – नागपूर एज्युकेशन हब झाले आहे. इथे रोजगार निर्माण झाला. हेल्थ हब म्हणून नागपूर विकसित होत आहे. नागपुरातील रस्ते सुंदर झालेत. कुठल्याही समाजावर अन्याय न करता नागपूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केला. ‘सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास आणि सबका विकास’, हेच आमचे ध्येय आहे, असा निर्धार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) व्यक्त केला.
मध्य नागपुरातील गोळीबार चौकात आयोजित विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या जाहीर सभेत ना. श्री. गडकरी बोलत होते. मध्य नागपूरचे भाजप-महायुतीचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार विकास कुंभारे, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत आगलावे, माजी महापौर अर्चना डेहनकर आणि दयाशंकर तिवारी, रविशंकर कुंभारे, राजेंद्र रंधनकर, गिरीश देशमुख, सुरेश गोजे, बंडू राऊत, दीपराज पार्डीकर, सुबोध आचार्य, रामभाऊ आंबुलकर, भास्कर पराते, श्रद्धा पाठक आदींची उपस्थिती होती.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘केळीबाग रस्ता मोठा करण्यात अनेक अडचणी आल्या. हा रस्ता पूर्ण व्हायला तेरा वर्षे लागली. पण प्रवीण दटके यांच्या कार्यतत्परतेमुळे या रस्त्याचे काम पूर्ण झाले. राजविलास टॉकीजच्या बाजुला मोठ्या इमारतीचे काम सुरू आहे. त्याठिकाणी सगळ्या छोट्या व्यापाऱ्यांना सामील करून घेतले जाईल. शुक्रवारी तलावाचे देखील सौंदर्यीकरण होत आहे. मध्य नागपुरातील अनेक विकासकामे दटकेंच्या प्रयत्नांमुळे आणि पुढाकारातून पूर्ण होत आहेत.’
गेल्या दहा वर्षांमध्ये हलबा समाजाचे अनेक प्रश्न सोडवले. पण हे सर्व राजकारणासाठी नव्हे तर समाजासोबत असलेल्या ऋणानुबंधांमुळे केले, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. साठ वर्षे ग्रामपंचाय, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका कांग्रेसकडे होते. पण एवढ्या वर्षांमध्ये नागपूरचा विकास झाला नाही. मात्र आपण दहा वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलला. नाहीतर सेंट्रल अव्हेन्यू रोडच्या वरून मेट्रो धावू शकते, असा विचारही कुणी केलेला नव्हता, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. नेताजी मार्केट, कॉटन मार्केट, संत्रा मार्केटचा विकास होणार असल्याचेही ना. श्री. गडकरी यांनी सांगितले.
कामठीच्या विकासासाठी प्रयत्नशील
कामठी-कन्हानपर्यंत मेट्रो येणार आहे. गावातील रस्ते चांगले होणार आहेत. या भागात भविष्यात चांगले मार्केट्स उभे होणार आहेत. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कामठीतील दलित आणि मुस्लिम समाजाचे जीवनमान उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा निर्धार ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. कामठी विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारार्थ ना. श्री. नितीन गडकरी यांची सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुलेखा कुंभारे, आमदार टेकचंद सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.