Teach Traffic Rules in Schools : Nitin Gadkari’s Appeal with Anupam Kher
शालेय जीवनातच मिळावे वाहतूक नियमांचे धडे
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी; सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी घेतली मुलाखत
नागपूर – वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना दंड ठोठावला. कायदे कडक केले; तरीही रस्ते अपघातातील मृत्यू थांबलेले नाहीत. मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत आपण यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण घेण्याच्या वयात मुलांवर चांगल्या गोष्टींचा प्रभाव पडला तर तो कायमस्वरुपी राहतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केले.
सडक सुरक्षा अभियानांतर्गत वनामती येथे आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी ना. श्री. गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली. सुरुवातीलाच अनुपम खेर यांनी ना. श्री. गडकरी यांनी देशभर महामार्गांचे जाळे विणण्याचे मोठे काम केल्याचा उल्लेख केला. अपघातांमध्ये मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे ना. श्री. गडकरी म्हणाले. ‘कोरोनामध्ये, युद्धामध्ये किंवा एखाद्या दंग्यामध्ये जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसेल तेवढे मृत्यू दरवर्षी रस्ते अपघातामध्ये होतात. याची मला खंत वाटते. रस्ते अपघात रोखायचे असतील तर अचूक निर्माणकार्य आणि समाजजागृती दोन्हींची आवश्यकता आहे. जनजागृतीचे कार्य शालेय स्तरापासूनच व्हायला हवे.’

या देशात आणखी उत्तम रस्ते तयार होतील. पण लोकांना शिस्त नसेल तर या रस्त्यांचा काहीही उपयोग नाही. सिग्नल तोडणे, लेन तोडून निघून जाणे, मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालणे, हेल्मेट न लावणे, सिटबेल्ट न बांधणे अशा कितीतरी चुका लोक करतात. आपली आईल, पत्नी, मुले घरी वाट बघत असतील, हे ध्यानात ठेवून गाडी चालवावी. कारण वर्षभरात होणाऱ्या अपघतांमध्ये जे मृत्यू होतात, त्यात १८ ते ३४ वर्ष वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहे. एखाद्या घरातील तरुण अचानक निघून जातो, तेव्हा त्या कुटुंबावर कोसळणाऱ्या संकटाची आपण कल्पनाही करू शकत नाही, अशा भावनाही ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केल्या.