दत्ताभाऊंनी शून्यातून विश्व निर्माण केले केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी; ८९व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा
नागपूर – दत्ताभाऊ मेघे यांनी राजकारणासह शिक्षण क्षेत्रातही उत्तम काम केले. समाजातील उपेक्षितांच्या सेवेचा ध्यास घेऊन ते जीवन जगले. त्यांनी खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्माण केले, अशा भावना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या ८९व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. अत्रे ले-आऊट येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्री. दत्ताभाऊ मेघे यांच्या अर्धांगिनी सौ. शालिनीताई मेघे, सुप्रसिद्ध गायक ‘भजन सम्राट’ अनुप जलोटा, माजी आमदार अशोक मानकर, प्रतिष्ठानचे सचिव राजू मिश्रा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘दत्ताभाऊंच्या जीवनाचा ८९ वर्षांचा इतिहास अनेकांनी जवळून बघितला आहे. सीपी अँड बेरार शाळेतील एक गरीब कुटुंबातील विद्यार्थी नागपुरात आईसफ्रूट विकतो. बघता बघता संघर्षातून आपलं विश्व निर्माण करतो ही सर्वाना चकित करणारी बाब होय. दत्ताभाऊंनी राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतली. हे यश मिळवत असताना त्यांनी समाजातील दुःखी, उपेक्षितांना अडचणीच्या काळात मदत केली. जिवाभावाने मैत्र जोपासले आणि योग्यवेळी आपली कामे कुटुंबातील पुढच्या पिढीकडे सोपवून दिली. हे अत्यंत कौतुकास्पद आहे.’ दत्ताभाऊ मेघे यांच्याच प्रेरणेतून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानची स्थापना झाली असल्याचा उल्लेख ना. श्री. गडकरी यांनी केला. सत्कार सोहळ्यानंतर अनुप जलोटा यांच्या भजनांची मैफल रंगली.