Job Creation Through Research: Nitin Gadkari Highlights Need for Innovation
रोजगार निर्माण करणारे संशोधन काळाची गरज
केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी; मोहता विज्ञान कॉलेजचा अमृत महोत्सव
नागपूर – विदर्भात जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या प्रादेशिक गरजा लक्षात घेऊन रोजगार निर्माण करणाऱ्या संशोधनावर भर द्यावा लागणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर शिक्षण मंडळ संचालित श्री मथुरादास मोहता विज्ञान कॉलेजच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. १८ जानेवारी) करण्यात आले. यावेळी ना. श्री. गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्कृती व पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, संस्थेचे अध्यक्ष मोहित शाह, डॉ. गजानन डांगे, संस्थेचे उपाध्यक्ष विकास बिंझाणी, राजीव देव, सतीश दंदे, प्राचार्य डॉ. जीवन दोंतुलवार, डॉ. जय देशमुख, डॉ. उदय बोधनकर यांची उपस्थिती होती.

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘दिल्लीत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याठिकाणी टाटा, सुझुकी, महिंद्रासारख्या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. या सर्व कंपन्यांनी फ्लेक्स इंजिनच्या गाड्या मार्केटमध्ये आणल्या आहेत. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर या गाड्या धावणार आहेत. टीव्हीएस, बजाज, होंडा यांच्या इथेनॉल आणि सीएजीवर धावणाऱ्या स्कुटर देखील मार्केटमध्ये आल्या आहेत. ते बघून मला खूप आनंद झाला. दोन वर्षांनी नागपूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होईल तेव्हा येथून उड्डाण भरणाऱ्या पहिल्या विमानात शेतकऱ्यांनी तयार केलेले इंधन असेल. यातून शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे आणि रोजगारही निर्माण होणार आहे.’
ना. श्री. गडकरी या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘मी या कॉलेजमध्ये शिकलो. त्यामुळे या शिक्षण संस्थेशी माझा जवळचा संबंध राहिलेला आहे. त्या काळात उत्तम अशा शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे आयुष्यात काहीतरी काम करता आले. त्यावेळच्या सर्वच प्राध्यापकांची आजही आठवण होते.’ यावेळी नारायणन सर, पेंडसे सर, मास्टे सर, मुरकुटे सर, खोत सर आदींच्या नावांचा त्यांनी उल्लेखही केला.
ते म्हणाले, ‘कॉलेजमध्ये खूप चांगले वातावरण होते. येथील कौटुंबिक वातावरणात संस्कारही उत्तम मिळाले. येथील अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, वैज्ञानिक, अधिकारी आहेत. आमच्या बॅचमधील अनेकांचे जीवन या कॉलेजने बदलले.’