Dr. Shriram Kandhare Honored for His Research on Nitin Gadkari
ना. नितीन गडकरी यांच्यावर शोधप्रबंध लिहिणारे डॉ. श्रीराम कंधारे यांचा सत्कार
नागपूर – विदर्भ गौरव प्रतिष्ठान नागपूरद्वार आयोजित समारंभात शोधप्रबंधक डॉ. श्रीराम कंधारे यांचा सन्मान करण्यात आला. मूळ कंधार (जि. नांदेड) येथील श्रीराम कंधारे लासळगाव (जि. नाशिक) येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. गेली पाच वर्ष कुठलीही फेलोशिप न घेता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्वाचा त्यांनी सखोल अभ्यास करीत बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगावला तो शोधप्रबंध सादर केला आणि त्यांना आचार्य पदवी प्राप्त झाली.
विदर्भ पुत्र नितीन गडकरी यांच्या कार्याने प्रभावित घेऊन त्यांच्यावर पी.एच.डी करणारे ते पहिलेच प्राध्यापक आहेत. समारंभाच्या प्रास्ताविकमध्ये विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी वैदर्भीयांच्या वतीने डॉ. श्रीराम कंधारे यांचे मनापासून कौतुक केले. आपल्या नेत्याची दखल केवळ तलगाळापर्यंत घेतली जात आहे, असे नव्हे तर त्यांच्या कार्य अहवालाचा अधिकृत दस्तावेज तयार होतो. याबाबतीत त्यांनी अभिमान आणि आनंदही व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम होते. ‘दरवर्षी एका विद्यापीठातून जवळपास एक हजार विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान होते. भारतभरात अशा असंख्य आचार्य पदवी धारकांमधून एखादाच शोधप्रबंध एवढा प्रभावी ठरला आणि उल्लेखनीय प्रसिद्ध झाला. याबाबत त्यांनी श्रीराम कंधारे यांचे अभिनंदन केले.
उपलब्ध साहित्य-संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून साधारण प्रबंध सादर केले जातात. किंबहुना श्रीराम कंधारे यांनी गडकरींच्या १९९५ पासूनच्या कार्याचा आणि राजकारणाचा अभ्यास करून त्यांच्या प्रतिष्ठीत कारकीर्दीचा आलेख प्रकाशित केला. ही असामान्य बाब त्यांनी लक्षात आणून दिली. संपूर्ण तार्कीक, व्यापक सूचितसंदर्भित आकलनीय आणि प्रमाणित प्रमाणावर आधारित विश्वसनीय तथापि वास्तविक व्यक्ति-कृती प्रकाशित करणारा नितीन गडकरींवरचा अद्वितीय शोधप्रबंध सादर करून डॉ. श्रीराम कंधारे यांनी गडकरींच्या पदाची प्रतिष्ठा वाढवली, असे प्रतिपादन कृष्णा मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.
समारंभाला शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित प्राध्यापक उपस्थित होते. लासलगाव, नाशिक, नांदेड वरून श्रीराम कंधारे यांचे सहकारी मित्र आवर्जुन आले होते. स्वागत निलेश खांडेकर, प्रगती पाटील व रुपाली मोरे यांनी केले. कार्यक्रमाला, प्रकाश इटनकर, विजय सालनकर, सागर लागड तसेच विदर्भ गौरव प्रतिष्ठान चे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालक शुभदा फडनवीस यांनी तर आभार प्रदर्शन बाळ कुळकर्णी यांनी केले.