Nitin Gadkari Empowers Artisans at Orange City Craft Fair 2025
“Empowering artisans, celebrating culture!”
कारागिरांनी परिस्थितीनुसार तसेच युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार डिझाईन बनवल्या तर त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे आयोजित ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्याच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
10 ते 19 जानेवारी दरम्यान मेळाव्यात 200 हून अधिक लोकनृत्य कलाकार तसेच 150 हस्तशिल्पकार होणार सहभागी; संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची राहणार रेलचेल
नागपूर 10 जानेवारी 2025
आपल्या देशातील रोजगार क्षेत्रामध्ये हातमाग ,हस्तकला या क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असून या कलेच्या वस्तू चांगल्या डिझाईन विकसित करून निर्यात करता येतात . कारागिरांनी परिस्थितीनुसार तसेच युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार डिझाईन बनवल्या तर त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अधीन नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे आयोजित ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्याच उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर, सहाय्यक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. हातमाग हस्तकला ग्रामीण क्षेत्रात रुजवल्यास या क्षेत्रात समृद्धता आणि संपन्नता येईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला . 10 दिवस चालणाऱ्या या मेळाव्यामध्ये दीडशेहून अधिक कलाकार आपले लोकनृत्य लोककला सादर करणार असून या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले

कलाकारांना त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी हक्काचा मंच उपलब्ध करून देण्यास ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा आयोजित करण्यात आल्याचे या केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी सांगितले . हस्तकला , लोककला त्याचप्रमाणे व्यंजन पाककृती यांचा सुरेख संगम या 10 दिवसीय मेळाव्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे असे त्यांनी सांगितले. . या दहा दिवसीय मेळाव्यामध्ये नागरिकांना 10 ते 19 जानेवारी या कालावधीत दुपारी 2.00 ते 9.30 या वेळेत हस्तकला मेळाव्यात प्रवेश दिला जाणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता मुख्य मंचावर लोकनृत्यांचे सादरीकरण सुरू होईल. हस्तकला मेळाव्यात सुमारे 150 हस्तकलाकार सहभागी होणार असून 200 हून अधिक लोक-आदिवासी कलाकार सहभागी होणार आहेत. ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्यामध्ये क्राफ्ट स्टॉल्ससोबतच भारतातील विविध राज्यांतील पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही खास आकर्षणाचे केंद्र असतील.
लोक आणि आदिवासी नृत्य सादरीकरणादरम्यान 10 ते 13 जानेवारी दरम्यान सायंकाळी 6.30 वाजता होजागिरी नृत्य (त्रिपुरा), मयूर, चारकुला (उत्तर प्रदेश), कालबेलिया (राजस्थान), मस्करत (पुडुचेरी), भांगडा (पंजाब) आणि गोटीपुआ (ओरिसा) हे नृत्य प्रकार सादर केले जातील.
14 जानेवारी मंगळवार रोजी संध्याकाळी 6.30 वाजता राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा महाराष्ट्राची लोकनृत्यं तसेच लोककलांचं सादरीकरण करणारा कार्यक्रम प्रस्तुत केला जाईल.
15 जानेवारी रोजी कार्यक्रमाचे पहिले सादरीकरण संध्याकाळी 6.30 वाजता एसवीके शैक्षणिक संस्थेच्या दिव्यांग मुलांद्वारे “भारतीय लोक आणि आदिवासी नृत्य शैली” वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाने होईल. कार्यक्रमाचे दुसरे सादरीकरण निकालस महिला महाविद्यालयाचे “कॅनव्हास टू कॅटवॉक” हे असेल. यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध लोकगायक डॉ. श्रीमती शैलेश श्रीवास्तव, मुंबई भारतीय पारंपरिक लोकगीते सादर करतील.

16 ते 19 जानेवारी रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपासून लोक आणि आदिवासी नृत्य सादरीकरणामध्ये घूमर/फाग (हरियाणा), सिद्धी धमाल (गुजरात), कारकट्टम (तामिळनाडू), रौफ (जम्मू काश्मीर) आणि अफिलो कुवो (नागालँड) आणि सिंघी छम/स्नो लायन (सिक्कीम) यांचे सादरीकरण असतील. या सर्व कार्यक्रमांसोबतच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून शासकीय अनुदान (रेपर्टरी ग्रँट) प्राप्त करणाऱ्या संस्थांची लोकनृत्येही नागपूर विभागात सादर होणार आहेत.
10 ते 15 जानेवारी 2025 पर्यंत कच्ची घोडी (राजस्थान) कलाकार सादरीकरण करतील तसेच 16 ते 19 जानेवारी पर्यंत बहुरूपी (राजस्थान) कलाकार विविध वेशभूषेत आपल्या कला प्रेक्षकांसमोर सादर करतील.
या कार्यक्रमात विविध राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते हस्तकलाकार आणि भारतातील प्रतिभावान कलाकार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यामध्ये हँड ब्लॉक प्रिंटिंग, एम्ब्रॉयडरी, जामदानी सूट, रंगकोट साडी, बनारसी साडी, लेदर, मेटल क्राफ्ट, ज्वेलरी, पंजा दारी डोअरमॅट, जरी वर्क, मॅट विव्हिंग, बेल मेटल, काश्मिरी आर्ट, चंदेरी साडी-सूट, चिकनकारी, फुलकरी, पंजाबी यांचा समावेश आहे. यासोबतच फर्निचर, कार्पेट, हातमाग, हस्तकलेच्या वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असतील.

ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्यात हस्तकलाच्या स्टॉल्ससोबतच भारतातील विविध राज्यांतील पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही खास आकर्षणाचे केंद्र असतील. पारंपारिक राजस्थानी,पंजाबी या खाद्यपदार्थांसोबतच सोबतच महाराष्ट्रीयन तसेच विदर्भाच्या खाद्य संस्कृतीचे पदार्थ उपलब्ध राहणार आहेत
सिविल लाईन स्थित डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह आणि आमदार निवास येथे मेळाव्यासाठी सशुल्क पार्किंगची सोय करण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे प्रवेश शुल्क 30 रुपये प्रति व्यक्ती ठेवण्यात आले आहे.