Nitin Gadkari Urges Research Centers to Boost Orange Productivity in Vidarbha
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी यावर संशोधन केंद्रांनी उपाय सुचवले गरजेचे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहननागपूर 19 जानेवारी 2025
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी या तीन बाबींवर कृषी संशोधन आणि संत्रा संशोधन केंद्र नागपूर यांनी आपले संशोधन तसेच उपाय सुचवले पाहिजे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले .’वनस्पती आरोग्य व्यवस्थापनामध्ये उद्भवणारे मुद्दे आणि शाश्वत धोरण- एक वैश्विक दृष्टिकोन ‘या विषयावर इंडियन फाइटो पॅथॉलॉजिकल सोसायटी नवी दिल्ली तसेच नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था यांच्याद्वारे आयोजित तीन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आज ते बोलत होते .याप्रसंगी भारतीय कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक केंद्रीय निंबूवर्गीय संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष , कृषी वैज्ञानिक शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी गडकरी यांनी संशोधन हे गरज आधारित आणि प्रादेशिक गरजेच्या आधारित राहायला हवे असे सांगून त्याची आर्थिक व्यवहार्यता सुद्धा असायला हवी असे सांगितलं. केंद्रीय निंबूवर्गीय संशोधन संस्थेने खाजगी रोपवाटिकांसोबत संयुक्त करार करून त्यांना चांगली रोपे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते तांत्रिक सहाय्य द्यायला हवे असे त्यांनी याप्रसंगी सुचित केले, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादकतेमध्ये मर्यादित यश मिळत असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रोपवाटिकांना प्रमाणित करणे त्याचप्रमाणे रोग मुक्त रोपे त्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी सांगितलं .संत्रा प्रक्रिया उद्योग यामध्ये भरपूर संधी उपलब्ध असून संत्र्यावर मूल्यवर्धन करून त्यात सुद्धा संशोधन होणे गरजेचे आहे .मदर डेअरी तर्फे नागपुरात तयार होणाऱ्या ऑरेंज बर्फीची शेल्फ लाइफ वाढवण्याकरिता संत्र्याच्या भुकटीचा वापर करण्याचा देखील त्यांनी सल्ला दिला.
याप्रसंगी इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च त्याचप्रमाणे नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्था, अकोल्या मधील असोसिएशन ऑफ प्लांट पॅथॉलॉजिस्ट या संस्थेचे आणि विविध कृषी विभागातील संशोधक, विद्यार्थी या परिषदेत उपस्थित होते. 19 20 21 जानेवारी दरम्यान ही परिषद नागपूर मध्ये आयोजित करण्यात आली आहे या परिषदेदरम्यान प्लांट पॅथॉलॉजी वर विविध तज्ञांचे व्याख्यान त्याचप्रमाणे संशोधन अहवाल सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे.