“Revolutionizing Clean Energy: Dr. Chaitanya Gend’s Breakthrough in Hydrogen Storage Technology”
स्वच्छ ऊर्जा स्त्रोतावर डॉ. चैतन्य गेंड यांचे यशस्वी शोधप्रबंध
4 आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर केले पब्लिश
संपूर्ण जगभरात सध्या पर्यायी इंधन आणि ऊर्जास्रोतांचा शोध आणि प्रत्यक्ष वापरासाठी शास्त्रन प्रयत्न करीत आहेत. कारण जीवाश्म इंधनाचे मर्यादित साठे आणि त्यांच्या ज्वलनातून होणारे वायु प्रदूषण व त्यामुळे निर्माण झालेले तापमान वाढीसह अन्य गंभीर प्रश्न ही आज संपूर्ण जगापुढील एक महत्त्वाची समस्या बनली आहे. भारताने अलीकडील काळात स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधनांकडे वेगाने पावले टाकण्याचे धोरण स्वीकारले. विद्युत वाहनांना गती, सौरऊर्जेचा वापर, इथेनॉलला चालना या जोडीला हरित हायड्रोजन काळाची गरज आहे. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असून त्याचे पर्यावरण व अर्थव्यवस्थेसाठी असणारे फायदे अमुलाग्र आहे. स्वच्छ उर्जा स्त्रोत असलेल्या सुरक्षित ‘Hydrogen Storage’ करण्याचे अनोखे शोधप्रबंध महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) चे संशोधक डॉ. चैतन्य बबन गेंड यांनी तयार केले. महाज्योती’ मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देत आहे.
डॉ. चैतन्य बबन गेंड यांनी भौतिकशास्त्र या विषयातून डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई येथून पी. एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. ‘फंक्शनल नैनोमटेरियल्स फॉर हाइड्रोजन स्टोरेज यूसिंग डेंसिटी फंक्शनल थेरी’ या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केले. सुरक्षित हायड्रोजन साठवणूक हे इंधन म्हणून वापरण्यासाठी एक प्रभावी असलेल्या या प्रबंधात त्यांनी उपरोक्त विषयावर 4 आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर पब्लिश केले. प्राध्यापक डॉ. अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात डॉ. चैतन्य गेंड यांनी 3 वर्षात अभ्यासपूर्ण शोध प्रबंध तयार केले. देशासह राज्याला ‘हायड्रेजन गॅस स्टोरेज’साठी डॉ. गेंड यांचे रिसर्च उपयुक्त ठरेल यात काही शंका नाही.
पराकोटीला पोहोचलेल्या वायुप्रदूषणामुळे एकीकडे आरोग्यविषयक नवनवीन समस्या उद्भवत आहेत. तर दुसरीकडे पृथ्वीवरील तापमानात लक्षणीय वाढ होत चालली आहे. या तापमानवाढीमुळे हिमनग वितळण्याची प्रक्रिया गतिमान बनली आहे. ऋतुमानाचे चक्र बिघडले आहे. परिणामी संपूर्ण जीवसृष्टी आणि मानवी अस्तित्वच धोक्यात येते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. सुरक्षित हायड्रोजन साठवणूक हे आज अत्यावश्क झाले आहे. हायड्रोजन इंधन म्हणून वापरण्यासाठी एक महत्वाची आणि आव्हानात्मक प्रक्रिया आहे. दुसरीकडे हायड्रोजन साठवणूक प्रभावी आणि सुरक्षित असणे आवश्यक आहे. जेणेकरून ते औदयोगिक, वाहतूक आणि ऊर्जा वापरासाठी उपयुक्त ठरू शकेल यात प्रामुख्याने दाबाने गैस स्वरूपात (कॉम्प्रेस्ड गॅस) या पद्धतीचा वापर केला जातो. परंतु, उच्च दाबामुळे गळती आणि स्फोटाचा धोका असतो. द्रवरूप हायड्रोजन, मेटल- हायड्राइइस, कार्बन नैनोट्यूबस इत्यादी व्दारे देखील साठवणूक करता येते. परंतु कमी साठवण क्षमता आणि वजन यांमुळे ते किफायतशीर नाही.
हायड्रोजन ऊर्जेतून शून्य टक्के प्रदूषण
हायड्रोजनला स्वच्छ ऊर्जा स्रोत म्हणून मान्यता मित असताना हायड्रोजन साठवण्यासाठी मटेरिअल आधारित तंत्रज्ञान हे सुराक्षित आणि कार्यक्षम पर्याय पुढे येत आहे. यामध्ये डॉ. चैतन्य गेंड यांनी अमेरिकन ऊर्जा विभागाने ठरवलेले उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी संपूर्णतः नवीन रेणू कार्बन नॅनोरिंगचा वापर करून हे उद्दिष्टे पूर्ण केली आहे. या हायड्रोजन ऊर्जेतून शून्य टक्के प्रदूषण होणार. मटेरिअलवर आधारित हायड्रोजन साठवणूक हे ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवू शकते. नुकतेच भारतात महाराष्ट्र सरकारने हरित हायड्रोजन निर्मितीसाठी 2 लाख 76 हजार 300 कोटी रूपये एवढी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्याा तब्बल 7 प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहे. यातून 64 हजार रोजगार निर्माण होणार आहे. तसेच डिसेंबर महिन्यात हरियाणातील जिंद आणि सोनीपत दरम्यानच्या 90 किमी. मार्गावर हायड्रोजनवर चालणारी रेल्वे चाचणी धाव घेईल. यशस्वी झाल्यास एकूण 35 हायड्रोजन रेल्वे चालविण्याचा भारतीय रेल्वेचा निर्णय आहे. या सर्व बाबींचा विचार करून हायड्रोजन स्टोरेजवर यशस्वी संशोधन करण्याचे ध्येय बाळगत डॉ. गेंड यांनी 3 वर्ष यावर संशोधन करण्यास सुरूवात केली. पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांनी विद्यावेतनाकरिता महाज्योतीकडे अर्ज केला. महाज्योतीकडून दरमाह मिळणारे विद्यावेतन तसेच प्रा. डॉ. अजय चौधरी यांचे मार्गदर्शनातूनच डॉ. गेंड यांनी आपला शोध प्रबंध यशस्वी पूर्ण केले. डॉ. चैतन्य गेंड यांना महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांचे सहकार्यासह वडिल बबन गेंड आणि आई पुष्पा गेंड यांनी दिलेल्या आशिर्वादाचे आभार मानले आहे. तसेच भविष्यात देखील महाज्योती संस्थेकडून मिळणाऱ्या फेलोशिपचा संशोधकांना फायदा होणार असा विश्वास डॉ. गेंड यांनी व्यक्त केले.
हरित हायड्रोजन उपलब्धता उपयुक्त ठरणार: राजेश खवले
‘महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. त्यामुळेच आज काळाची गरज असलेले हरित हायड्रोजन सुरक्षित उपलब्धतेवर सखोल अभ्यास करण्याचे संशोधन डॉ. चैत्नय गेंड यांनी केले आहे. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांने केले हे संशोधन अभिमानास्पद आहे. त्यांनी महाज्योतीसह देशाचे नावलौकिक करण्याचे काम केले आहे. महाज्योतीकडून मिळणाऱ्या विद्यावेतनातून राज्यातील हजारो विद्यार्थी हे प्रगती पथावर गेले आहे. महाज्योतीने आता ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) मध्ये 37 हजार रूपये व सीनियर रिसर्च फ़ेलोशिप (एसआरएफ) करिता 42 हजार रूपये प्रतिमाह दराने अधिछात्रवृत्तीची रक्कम तसेच घरभाडे भत्ता 30 टक्के, 20 टक्के व 10 टक्के या सुधारित दराने देण्यात येत आहे. पीएचडी संशोधकांची भरीव कामगिरी ही देशाला प्रगतीपथावर नेणार, असे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले म्हणाले. डॉ. गेंड यांचे प्रबंध देशासह जगासाठी हितकारक ठरणार अशी प्रतिक्रीया खवले यांनी दिली आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी डॉ. गेंड यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कुणाल शिरसाठे
प्रकल्प संचालक
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),
महाराष्ट्र राज्य, नागपूर