Fostering Social Responsibility : Nitin Gadkari’s Call at Rotary Event
“Building a better world through shared responsibility.”
प्रत्येकाला असावी सामाजिक जबाबदारीची जाणीव
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी; रोटरी इंटरनॅशनलतर्फे वार्षिक परिषद
नागपूर – समाजात खूप समस्या आहेत. पण प्रत्येक समस्या पैशाने सुटणार नाही. पैसा हे जीवन जगण्याचे साधन आहे, पण ते साध्य असू शकत नाही. त्यामुळे समाजातील शीषित, वंचित, पीडितांच्या समस्या सोडवायच्या असतील तर प्रत्येकामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार, दि. ११ जानेवारी) केले.
‘रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३०’च्या वतीने वार्षिक परिषद ‘रिजॉईस’चे आयोजन करण्यात आले. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ना. श्री. गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्र खुराणा, बी.रे. सुनिता दीदी, राजशेखर श्रीनिवासन, डॉ. विनय टुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आपला देश सुखी, संपन्न समृद्ध व्हावा, विश्वगुरू व्हावा यासाठी आपण सारे प्रयत्नशील आहोत. जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी बघितले आहे. आपण ते उद्दिष्ट गाठणार यात मुळीच शंका नाही. पण त्यात प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव आवश्यक आहे.’
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सामाजिक, शैक्षणिक जीवनात अनेक बदल झाले. त्यातून आपण येथपर्यंत प्रवास केला. विकासही झाला. पण हे पुरेसे नाही. अजून खूप काम करावे लागेल. त्यामुळे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील नेतृत्व ऊर्जा प्रदान करत असतात. रोटरीदेखील त्याच धरतीवर काम करत आहे. रोटरीने लोकांची सेवा केली. अनेक उपक्रम आयोजित केले. त्यांच्यामुळे पीडितांना जगण्याचे बळ मिळाले. अशी संवेदनशीलता प्रत्येकात असण्याची आज गरज आहे. समाजातील दुःख बघितल्यावर आपण लोकांसाठी काय करू शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी स्व. लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या एकल विद्यालय उपक्रमाचेही उदाहरणही दिले.